नंदुरबार :- शिवसेना व भाजपला मतदारांनी जनादेश दिल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा हा निर्णय शिवसैनिकांसह मतदारांचा अनादर करणारा आहे.
ठाकरे यांनी भाजपसोबतच राज्यात सत्ता स्थापन करावी, या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील कार्ली गावातील तुकाराम पाटील या शिवसैनिकाने मोबाइल टॉवरवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे माझ्याशी बोलत नाहीत, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, अशी शपथही तुकारामने घेतली आहे.
या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तुकाराम पाटील हा स्वत:ला जुना शिवसैनिक म्हणवून घेतो. ताे बाळासाहेब ठाकरे यांचा चाहता आहे. मात्र, राज्यातील मुख्यमंत्रिपदाचे सत्तानाट्य पाहता लवकरच दोन्ही काँग्रेसव शिवसेनेच सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे निराश झालेला तुकाराम हा बुधवारी शहरातील गोपाळनगर भागातील २१० फूट उंचीच्या मोबाइल टॉवरवर चढला आहे. टाॅवरवर चढण्यापूर्वी त्याने कागदावर मजकूर लिहून तो जाळीला चिकटवला. त्यानंतर तो टाॅवरच्या शेवटच्या टाेकावर जाऊन बसला.