Maharashtra News : सुरत – चेन्नई ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६४२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
पण सद्यःस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारण्यासाठी केवळ २५० शेतकऱ्यांनीच भूसंपादन क्रमांक ११ दाखल कार्यालयात प्रस्ताव आहेत, उर्वरित २ हजार ६९८८ शेतकऱ्यांनी अद्यापही भरपाई स्वीकारण्यासाठीची अनुकूलता दाखवलेली नाही. या महामार्गाच्या भूसंपादनात कमालीची संथ गती दिसून येत आहे.
सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारने यापूर्वीच निश्चित केला आहे.हा मार्ग सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट वा चार तालुक्यातील ६१ गावांतून पुढे कर्नाटक राज्याला जोडला जाणार आहे.
ग्रीन कॉरिडॉरबरोबरच सोलापूर शहरासाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेल्या बाह्यवळण मार्गालाही केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. ग्रीन आणि बाह्यवळण या दोन्ही मार्गासाठी प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कार्यवाहीस सुरुवातही झाली आहे.
वैराग अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना कमी मोबदला मिळत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वाढीव मोबदल्यासाठी अनेकवेळा आंदोलनही झाली. वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले,
त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना चौरस मीटर फुटानुसार भरपाई हवीयू त्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे. शिवाय अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनीही वाढीव मोबदल्यावर दावा केला आहे. त्यामुळेच भूसंपादनाच्या कामात संथ गती दिसून येत आहे.
भूसंपादनातील ठळक बाबी
■ २ हजार ९४८ एकूण बाधित खातेदार
■ नुकसान भरपाई स्वीकारण्यासाठी ३४ गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा
■ भरपाईसाठी अक्कलकोट १६४ कोटी ४९ लाख, बार्शी १३३ कोटी ७१ लाख, दक्षिण सोलापूर ४६ कोटी २ लाखांचा निधी
■ नुकसानभरपाई रक्कम स्वीकारण्यासाठी २५० शेतकऱ्यांचे प्रस्ताव
■ मार्च २०२२ पर्यंत बाधित शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांचा मोबदला वाटप
जिल्ह्यातून १५१ किलोमीटरचे अंतर
सोलापूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉरची लांबी १५१ किलोमीटर आहे. बार्शी तालुक्यात १६ गावे ३६ किमी. उत्तर सोलापूर ८ गावे २४ किमी, दक्षिण सोलापूर १५ गावे ४३ किमी आणि अक्कलकोट २० गावे ४८ किमी याप्रमाणे तालुकानिहाय ग्रीन कॉरिडॉर मार्गावरील गावे आणि त्याचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
भूसंपादनास प्रत्यक्षात सुरुवात !
सुरत – चेन्नई ग्रीन कॉरिडोर महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातून (१२ गावे) पुढे सोलापूर जिल्हातील बार्शी तालुक्यात येणार आहे. बार्शीतून पुन्हा धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात (१८ गावे हा महामार्ग जाऊन पुनश्च उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमार्गे कर्नाटक राज्याला जोडला जाणार आहे. या ग्रीन कॉरिडॉरसाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांतील भूसंपादनास प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे.
वाढीव मोबदला मिळावा, यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार
सरकार वाढीव मोबदला देण्याच्या मूडमध्ये दिसत नाही, त्यामुळे जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. वाढीव मोबदला मिळावा, यासाठी लोकायुक्तांकडे शेतकरी तक्रार करीत आहेत. लोकायुक्तांकडे निर्णय झाल्याशिवाय जमिनीचे भूसंपादन करू नये, अशी भूमिका आहे. – बाळासाहेब मोरे, अध्यक्ष, संघर्ष समिती