अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे.
तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. बोठे फरारी आहेत व त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांच्या घराची झडती घेऊन काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. त्यावेळी बाळ बोठे बराच काळ स्वत: जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. जरे यांचा लहान मुलगा व त्यांच्या आईचे तो सांत्वन करीत होता. पोलीस जरे यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेत असतानाही बोठे सावलीसारखा तेथेच उपस्थित होता.
तो प्रत्येक माहितीकडे लक्ष ठेवत होता. तेव्हापासूनच बोठे याच्याबद्दल शंका निर्माण झाली होती. जरे हत्याकांडात बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे सक्षम पुरावे असून, त्याच्या अटकेनंतर यात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved