अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- सर्वच समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, त्यांच्याशी भेदभाव करु नये असं आवाहन राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
ते साताऱ्यात बोलत होते. उदयनराजे म्हणाले, “केवळ मराठा समाजाच्याच नव्हे तर सर्वच जातीतील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात मराठा समाज आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने भेदभाव करणं त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही. दुसऱ्याचं काढून आम्हाला देऊ नका पण जसं इतरांना न्याय दिला तसा आम्हालाही न्याय मिळायला हवा.
प्रत्येकाला वाटतं की मराठा समाज सधन आहे. मात्र, शेतमजूर कष्टकरी मराठा समाजाची अवस्था बिकट आहे. त्यासाठी आरक्षण गरजेचं आहे.”
निवडणुका दर पाच वर्षांनी होतच असतात त्यामुळे मराठा समाजानं हे लक्षात घ्याव की, जर लोकप्रतिनिधी तुमच्या अधिकाऱांसाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्ही अशा लोकांच्या पाठीशी उभं राहता कामा नये,
असंही यावेळी उदयनराजे म्हणाले. राज्य सरकारवर टीका करताना उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना तिथे बाजू मांडता सरकारचे वकील वेळेवर हजर राहत नाहीत, हे जाणीवपूर्वक केल्यासारखचं दिसून येतं.
पण हे नक्की का होतं हे माहिती नाही. सरकारमधील सर्व नेते मंडळींना माझी एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये कारण जर एकदा त्यांचा उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण?
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved