माजीमंत्री पिचड यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अपमान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे समर्थक संंभ्रमावस्थेत आहेत. कोणाशीही कोणाचा संवाद नाही. पराभवाची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीत.

ज्या ५५ हजार नागरिकांनी आपल्याला मतदान केले, त्यांचे आभार मानण्याऐवजी पिचड आपल्याच कार्यकर्त्यांना अपमानित करत आहेत. शैक्षणिक व सहकारी संस्थेतही पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवला जात नाही, अशी खंत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी व्यक्त केली.

पुत्र वैभव यांच्या दारुण पराभवाने व्यथित झालेल्या मधुकर पिचड यांनी एका समारंभात आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम केले नसल्याचे सांगत ज्यांना आजवर मी काही कमी केले नाही त्यांनीच बेईमानी केली,असे विधान केले.

राजकीय वर्तुळात यावर खल झाला. या पार्श्वभूमीवर पांडे पत्रकार परिषदेत म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेत जेवढे योगदान नेत्याचे असते, तेवढेच कार्यकर्त्यांचेही असते. कोणताही पराभव खुल्या दिलाने स्वीकारून झालेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडल्यास पुढची वाटचाल कधीच यशस्वी होत नाही.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मागील पाच वर्षांत तालुक्यात विकासकामे झाली नाहीत. पिचड पिता-पुत्राने विकासाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी सोडून भाजपची वाट धरली. मात्र, भाजपची विचारसरणी तालुक्याला पटण्यासारखी नाही.

भाजपची विचारधारा मान्य नसतानाही केवळ पिचडांविषयी प्रेम असल्यानेच जिकडे नेता, तिकडे कार्यकर्ताअसे मानून माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पिचडांना साथ दिली, असे सांगून पांडे म्हणाले, मी राष्ट्रवादी सोडलेली नाही व भाजपचे साधे सामान्य सभासदत्व स्वीकारलेले नाही.

अद्याप मी पिचड यांच्यावर निष्ठा असलेला व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व बाळासाहेब थोरात यांना मानणारा कार्यकर्ता आहे. निवडणुकीत मी व कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांना निवडून आणण्यासाठीच काम केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment