अहमदनगर लाईव्ह24 टीम :- २५ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची आपल्याला सवय जडलेली असून विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने आपण कदापी खचणार नाही. मी जीवनात नेहमी संघर्ष केलेला आहे. म्हणून सामान्य जनता व कार्यकर्ते यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथे सन २०१९-२० मधील मंजूर कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेशाम लहारे होते. भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, उत्तमराव म्हसे, बाळकृष्ण बानकर, युवा तालुकाध्यक्ष रविंद्र म्हसे, गोरक्षनाथ तारडे, युवा शहराध्यक्ष गणेश खैरे, अनिल आढाव आदी यावेळी उपस्थित होते.
मा.आ.कर्डिले पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात राहुरी विधानसभा मतदार संघात पाणीपुरवठा योजना, रस्ते, सभामंडप आदी विकासाचे मोठे काम झाले. परंतु सध्याचे सरकार फक्त पूर्वीच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचे काम करत आहे. ब्राम्हणी व इतर पाच गावांसाठीची मंजूर पाणी योजना फक्त श्रेय घेण्यासाठी थांबली आहे का? मतदारसंघात विजेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळा नदी काठावरील गावांसाठी बंधारा भरून देण्याची मागणी आहे. डाव्या कालव्याचे आवर्तन होणे आवश्यक आहे. सहा महिने आम्ही वाट पाहणार आहोत परंतु यामध्ये सुधारणा झाली नाही तर जनतेसाठी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. सामान्य जनतेसाठी आपण नेहमीप्रमाणे काम करणार करीत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक व युवा तालुकाध्यक्ष रविंद्र म्हसे म्हणाले की, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा वेगाने काम करणारा माणूस काही लोकांनी निवडणुकीत भावनिक होऊन मतदान केल्याने गमावला, हे तालुक्याचे दुर्दैव आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेची मदत झाल्यानेच सुरू झाला. मुळा नदी काठावरील गावांना गरज असेल तेव्हा बंधारे भरून मिळत होते. परंतु याची लोकांना आता जाणीव होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com