नव्या सरकारबाबत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रीया

Published on -

शिर्डी :- विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेन भाजपालाच पसंती दिली होती.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार हा आत्मविश्वास आम्हाला होता, मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी  दिलेले अभिवचन त्‍यांनी कृतीतुन खरे करुन दाखविले असल्‍याची प्रतिक्रीया माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७० व्‍या गळीत हंगामाच्‍या कार्यक्रमानंतर आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ.विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यात जनतेन भाजपाला दिलेला जनाधार हा मोठा होता या जनादेशाचा आदर व्‍हायला पाहीजे होता.

परंतू महीनाभराच्‍या सत्‍तेच्‍या नाट्यानंतर अखेर राज्‍याला स्थिर सरकार मिळाले ही अतिशय समाधानाची बाब असल्‍याचे नमुद करुन त्‍यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात मागील पाच वर्षात केलेल्या कामावर मतदारांनी निवडणुकीत विश्वास दाखविला होता.मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी  दिलेले अभिवचन कृतीतुन खरे करुन दाखविले असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

राज्‍यात  शेतक-यांच्‍या मदतीसाठी निर्णय होण्‍याची अपेक्षा आहे. त्‍या दृष्‍टीने काम सुरु करावे लागेल, नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत मिळाली आहेच यात आणखी वाढ कशी होईल याचा विचार निश्चित होईल. राज्‍यातील जनतेला भाजपाकडुनच विकासाच्‍या अपेक्षा आहेत. निवडणूकीत मिळालेला कौल हा त्‍यादृष्‍टीने महत्‍वपुर्ण होता असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्‍यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या शपथविधी सोहळ्याचा आनंद लोणी ग्रामस्‍थानी फटाक्‍याची आतशबाजीकरुन साजरा केला. आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लोणी गावचे ग्रामदैवत श्री.म्‍हसोबा महाराजांचे दर्शन घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe