अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- परखड विचारांची समाजाला गरज आहे. विचाराने एकत्र आलेली माणसं जग जिंकू शकतात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजेत. गुजराती माणूस वाटप करतो आणि मराठी माणूस वाटे करतो ही शोकांतिका असल्याची भावना शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक तथा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केली.
मराठा उद्योजक परिषदेच्या वतीने माऊली सभागृहात आयोजित लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. जाधव बोलत होते. मशाल प्रज्वलित करून मराठा उद्योजक परिषदेचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबियांना मदतीचे धनादेशचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक कडूभाऊ काळे, फुड मास्टरचे वैजिनाथ आंधळे, लाईफलाईनचे एन.बी. धुमाळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप चोभे, उद्योजक विजय मोरे, मराठा उद्योजक परिषदेचे संस्थापक भागचंद झांजे आदींसह उद्योजक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. जाधव म्हणाले की, इतर राज्यातील व देशातील शेतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी आपण उत्पादित केलेल्या अन्न-धान्य विकण्याची लाज बाळगू नये. भविष्यात पिकवण्यापेक्षा विकण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सुशिक्षित लोकांचं शासनव्यवस्था सर्वात जास्त शोषण करते.
समाजाला आरसा दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट करुन त्यांनी मराठा व मुस्लिम आरक्षणावर भाष्य केले. तसेच निर्व्यसनी तरूण व चारित्र्यवान व्यक्ती हिच देशाची संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात परिषदेचे संस्थापक भागचंद झांजे यांनी ही चळवळ फक्त मराठा समाजापुरती न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन बारा बलुतेदार, आठरापगड जातीला बरोबर घेऊन मराठा उद्योजक परिषद वाटचाल करणार असल्याचे सांगितले. एन. बी. धुमाळ यांनी आदर्श व प्रेरणेशिवाय यश मिळत नाही.
तर वैजिनाथ आंधळे यांनी पाच किलो शेंगदाण्यापासून फुडमास्टरपर्यंतचा प्रवास सांगितला. उद्योजक होण्यासाठी चांगलं राहणीमानाची गरज नाही तर मनापासून कष्ट करण्याची गरज असल्याचे मत कडूभाऊ काळे यांनी व्यक्त केले. यांसह प्रदीप चोभे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे संदिप गोंदकर, माऊली मोरगे, विकास पवार, धुळाभाऊ महारनोर, अविनाश जगताप, नागेश मुळीक, गणेश भोसले, तुकाराम म्हस्के, संजय चौधरी, सचिन लोखंडे, अमृत आजबे, अशोक वाघुले, अतुल हराळ, सुरेश कांबळे, भरत झांजे, महेश जाधव, गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.