अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ घालविणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाने कायमच हुलकावणी दिली. मात्र या दोघांचेही मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केले.
राहुरीला ७० वर्षांनंतर बापूसाहेबांचे चिरंजीव प्राजक्त आणि नेवाशाला पहिल्यांदाच यशवंतरावांचे सुपुत्र शंकरराव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, मुलांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले स्वप्न मुलांनी पूर्ण केले.आणि समर्थकांचा जल्लोष सुरू केला.
यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे अवघ्या राज्याला माहिती असलेली नावे. यशवंतराव गडाख हे तीन टर्म खासदार आणि दोन टर्म विधान परिषदेचे आमदार राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांची ख्याती. पण २७ वर्षे राज्याच्या राजकारणात अन् त्यापूर्वी जिल्हा परिषद , जिल्हा बँकेचे अध्यक्ष , राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी पदे गडाखांनी भूषविलेली .
पण त्यांना एकदाही मंत्रीपदाची संधी मिळाली नाही . पुढे ते साहित्य क्षेत्राकडे वळाले . १९९७ मध्ये नगरमध्ये ७० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात पार पडले ते गडाखांच्या नेतृत्वाखालीच. प्रसाद तनपुरे हे दोन टर्म खासदार अन् पाच टर्म आमदार राहिले , पण त्यांनाही मंत्रीपदाचा चान्स मिळाला नाही.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात राहुरीचे ल . मा . पाटील कोळसे यांना मंत्रीपद मिळाले होते . १९५२ नंतर राहुरीला कधीच मंत्रीपद मिळाले नाही. प्रसाद तनपुरे हे दावेदार असतानाही त्यांनादेखील लालदिव्याने हुलकावणी दिली .
गडाख – तनपुरे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची पात्रता असूनही मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने मंत्रीपदाचे दोघांचेही स्वप्न अधुरेच राहिले . या दोघांचे स्वप्नपूर्ती आज मुलांनी पूर्ण केली . प्राजक्त तनपुरे यांनी प्रथमच विधानसभेचे मैदान मारले अन् मुंबई गाठली . आज त्यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेत बापूसाहेबांचे स्वप्न पूर्ण केले.
शंकरराव गडाख यांचा २०१४ मध्ये ४ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला . तो पराभव गडाखांनी यंदाच्या निवडणुकीत गुलाल घेत भरून काढला अन् मुंबई गाठली . शेतकरी क्रांतीकारी पक्षाकडून विजयी झालेले शंकरराव गडाखांनी सर्वात अगोदर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून शंकरराव गडाख कॅबिनेट मंत्री झाले.