अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते.आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सुचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.
१० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित
राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मृत्यू दर हा राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या १० जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात ७९ टक्के रुग्ण आढळले आहेत असे लव अग्रवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितलं.
महाराष्ट्राचा मृत्यू दर ३.४७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.०७ टक्के आहे. पुणे २.३७ टक्के, ठाणे २,७२ टक्के, मुंबई ५.५० टक्के, नाशिक २.८२ टक्के, औरंगाबाद १.९७ टक्के, कोल्हापूर २.५३ टक्के, रायगड २.७८ टक्के , पालघर १.९३ टक्के, जळगाव ४.५१ टक्के, नगर १. १९ टक्के अशी प्रमुख जिल्ह्यांची मृत्यू दराची आकडेवारी असून ती कमी करण्याचे उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे असे ते म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved