अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोना संकटाचे सावट गडत होत असतांना जनतेला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रीया अधिक गतीमान होण्याची आवश्यकता असल्याने राज्य सरकारने विविध क्षेत्रातील अनुभव संपन्न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करुन राज्याच्या हितासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात आ.विखे पाटील म्हणाले की, कोवीड-१९ चे संकट अधिक गडद होण्याची शक्यता जागतीक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य या संकटात अधिक भरडले जात आहे. याकडे लक्ष वेधून सरकारकडुन अधिक तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी विविध क्षेत्रात अनुभव संपन्न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी करुन,
आ.विखे पाटील म्हणाले की, या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांनाही पत्राव्दारे ही बाब आपण निदर्शनास आणुन दिली असल्याचे सांगतानाच या मागणीमागे माझा कोणताही पक्षीय अभिनिवेश नाही.
एक नागरीक म्हणुन ही मागणी आपण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना संकटामुळे समाजातील प्रत्येक घटक आज अडचणीत सापडला आहे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांच्यावरच आर्थिक घडी अवलंबुन असल्यामुळे ठप्प झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वांनाच नवा विश्वास द्यायचा असेल तर सर्वांना एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच उच्चाधिकार समितीमध्ये सगळ्याच क्षेत्रांमधील अनुभवी व्यक्ती, तज्ज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश करावा असे त्यांनी सुचित केले.
राज्यामध्ये आज प्रक्रीया उद्योग तसेच इतर उद्योगांचे उत्पादन पुर्णत: बंद आहे. हे उत्पादन सुरु होण्यासाठी आपल्याला राज्यातील कामगारांबरोबरच परप्रांतीय कामगारांचीही गरज लागणार आहे. अडकुन पडलेल्या कामगारांचा, ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न अद्याप तसाच आहे. दळणवळण ठप्प असल्यामुळे सामान्य माणसापुढचे प्रश्नही अधिक गंभिर बनत चालले असल्यामुळे कोरोनाचा सामना करतानाच भविष्याच्या दृष्टीने आता काही निर्णय तातडीने करावे लागतील.
सरकारने राज्याच्या हितासाठी निर्णय करण्याची वेळ आली आहे असे सांगतानाच आ.विखे पाटील म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासुन राज्य सरकार निर्णय घेतयं परंतू समन्वयाचा मोठा अभाव असल्यामुळे पाहिजे तशी निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आधिका-यांच्या आदेशावर प्रशासन सुरु आहे. त्यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यात कुठलाही संवाद राहीलेला नाही. त्यामुळे कोरोना संकटाचे आव्हान पेलतानाच भविष्याच्या दृष्टीकोनातून सरकारने अधिक कठोर निर्णय घेवून जनतेला दिलासा द्यावा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®