अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.
कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी राम शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आमदार पवार यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला.
जामखेड तालुक्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीची पार्श्वभूमी यामागे आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशावेळी काही नॉलेज नसलेल्या व्यक्ती राजकीय दृष्टीकोनातून आरोग्य विभागाच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. यामुळे आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत, याचा विसरही त्यांना पडला आहे.
सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान व अनुभव महत्त्वाचा असतो. तरीही काही जण यात हस्तक्षेप करीत आहेत, हे योग्य नाही. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोनाच्या चाचण्या होत नाहीत. त्या करून रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे, हा खरा करोना नियंत्रणात ठेवण्याचा पर्याय आहे.’ असेही शिंदे म्हणाले.
कोरोना हा गंभीर आजार असून दोन-चार दिवस कोरोणाची रुग्णसंख्या तालुक्यात अत्यंत कमी झाल्याचे पहावयास मिळाले होते. मात्र हीच संख्या पुन्हा वाढताना दिसत असून यामागील षडयंत्र उघड होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढल्यास त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर येणार असून सध्या गंभीर आजाराच्या रुग्णांना नगर सारख्या ठिकाणी बेड लवकर उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतते आहे. त्यामुळे या काळात कोरोना सारख्या गंभीर आजारा ला तेवढ्याच उत्तम नियोजनाने तोंड देणे आवश्यक असताना मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही असेच पहावयासच मिळत असून प्रशासनाने याकडे जबाबदारीनेे लक्ष द्यावे असे आवाहन प्राध्यापक शिंदे यांनी केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved