अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : खासदार किंवा आमदार होण्यासाठी राहुरीच्या डाॅ. तनपुरे साखर कारखान्याला मदत केली नाही.
ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व बाजारपेठांचे भवितव्य अवलंबून असल्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पुर्नगठण करण्यास यापूर्वी मदत केली.
मात्र, सत्ताधाऱ्यांकडून बँकेच्या अटीची पूर्तता झाली नसल्याने हे प्रकरण नाबार्डकडे गेले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तनपुरे साखर कारखाना सुरू होण्यास मीच अडचण करतोय,
अशी वातावरण निर्मिती केली जात आहे. याबाबत साखर कारखाना संचालक मंडळ का गप्प आहे?, अशा शब्दात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी संचालक मंडळाला सुनावले आहे.
कर्डिले म्हणाले, राहुरी साखर कारखान्यास मदत करताना मी कधीही खासदार किंवा आमदार होण्याचे राजकारण पाहिले नाही. साखर कारखाना नसताना देखील राहुरी विधानसभा मतदारसंघातून मी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे.
सत्ता कुणाची असो, लोकप्रतिनिधी या नात्याने मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली. साखर कारखाना सुरू झाल्यानंतर संचालक मंडळाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही.
मात्र, सहकार्य करून देखील माझ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न होत असेल, तर खपवून घेणार नाही, असे कर्डिले यावेळी म्हणाले.