अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : अनाथालयातील बालकांना इतिहासाची माहिती व्हावी, स्वराज्य मिळविताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून कसे गड काजीब गेले.
या इतिहासाचे चित्रपटाच्या माध्यमातून चिमुकल्यांना आकलन व्हावे या हेतूने शिर्डी युवा ग्रामस्थ संघटनेचे नितीन अशोकराव कोते यांच्या पुढाकारातून आगळावेगळा उपक्रम राबवित सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करून अनाथालयातील सुमारे ११० मुले व तेथील कर्मचाऱ्यांना ‘तानाजी’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला.
चित्रपट पाहून विद्यार्थी भारावून गेले.दरम्यान, चित्रपटगृहात या मुलांना जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पॉपकॉर्न दिले. हा चित्रपट अनाथालयातील मुलांना दाखविण्याची कल्पना शिर्डी युवा ग्रामस्थ संघटनेचे नितीन कोते यांना सुचली.
कोते यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनाथ मुलांना मोफत चित्रपट दाखविण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यास तरुणाईने मोठा प्रतिसाद दिला. शंभर, दोनशे, पाचशे, हजार याप्रमाणे शिर्डी, लोणी, नाशिक, मुंबई, राहाता येथील मित्रपरिवाराने मदतीचा हात पुढे केल्याने सुमारे साडेचौदा हजार रुपये जमा झाले.
या मुलांना जाण्या-येण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साईराज रमेश कोते यांनी ट्रॅव्हल बस, शुभम जाधव व सागर कोते यांनी प्रत्येकी एक क्रूझर गाडीची सुविधा उपलब्ध करून दिली.