मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून कोरोना आजाराचा समावेश गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये करावा आणि मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे व संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पत्रव्यवहार केल्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 17 डिसेंबर 2020 रोजी कोविड आजाराचा शासनाने ठरवलेल्या गंभीर आजारांच्या यादीत समावेश केला आहे. परंतु हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दि. 2 सप्टेंबर 2020 पासून लागू केल्याचे नमूद केले आहे.

शिक्षक, शिक्षकेतर यांना जून महिन्या पासून आठवड्यातून 2 दिवस उपस्थिती सक्तीची केली होती. शासकीय कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी 2 सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात कार्यालयात येऊ लागले. यांचा संदर्भ संबंधित जी.आर. मध्ये दिला असून, हा जी.आर. 2 सप्टेंबर पासून लागू केल्याचा आरोग्य विभागाचा तर्क दिसतो.

पण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्या अगोदरही मोठ्या प्रमाणात कर्तव्यावर होते. कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक, शिक्षकेतर यांना ड्युटीवर लावण्यात आले. यामध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेतर बाधित झाले. त्यांच्या परिवाराला वैद्यकीय परिपूर्ती पासून दूर ठवणे हा अन्याय आहे. मुंबईमध्ये मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला.

हजारो कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. खाजगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करताना बिल वसूल केले. याचा आर्थिक भूर्दंड कर्मचार्‍यांना सोसावा लागला. नोकरदार कर्मचारी या बिलांमुळे कर्जबाजारी झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे 2 सप्टेंबर 2020 ही पूर्वलक्षी प्रभावाची तारिख कोरोनाग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्यायकारक ठरणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च पासून सुरु झाला व या कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी योगदान दिले आहे.

कोरोनाच्या बिलाची परिपूर्ती मिळण्यासाठी कोणतीही दिनांकाची अट न ठेवता मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळण्याची मागणी करण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment