अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
गडाख नेवासे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे, तसेच अन्य प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. नार्वेकर यांची गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने त्यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता.
सेना सत्तेत असो वा नसो, मी तुमच्याबरोबर राहीन, असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसऱ्या पिढीतील दोन्ही कुटुंबांतील सदस्य आता शिवबंधनात बांधले गेले आहेत.
गडाख हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील मातब्बर कुटुंब मानलं जातं. नगर शहरातील माजी मंत्री अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले.
त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मंत्री गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीला मोठी मदत होणार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved