कर्नाटकातील सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या धारवाड जिल्ह्यातील हट्टी गोल्ड माइन्स (एचजीएमएल) आणि कोलार गोल्ड फिल्ड्स यांना किल्लारहट्टी आणि चिन्नीकट्टी येथे सोन्याच्या उत्खननासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या कामासाठी एका वर्षाची निविदा निश्चित करण्यात आली आहे.
दोन ठिकाणी उत्खननाला सुरुवात
नॅशनल मिनरल्स एक्स्प्लोरेशन ट्रस्ट (एनएमईटी) यांनी गेल्या वर्षी देशभरातील पाच ठिकाणी सोन्याच्या शोधासाठी सर्वेक्षण केले होते. सोन्याच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आता किल्लारहट्टी आणि चिन्नीकट्टी या दोन ठिकाणी उत्खननाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्लारहट्टी हे गाव कोप्पळ आणि रायचूर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे, तर चिन्नीकट्टी हे हावेरी जिल्ह्यात आहे. याशिवाय झारखंड, ओडिशा आणि लडाख येथेही सोन्याच्या खाणींचा शोध घेतला जात आहे.

प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण
केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. कृष्णरेड्डी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. किल्लारहट्टी येथे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर चिन्नीकट्टी येथे स्टेज जी-३ अंतर्गत खनिजांची तपासणी सुरू आहे. भूगर्भीय संशोधनातून सोने आणि इतर धातूंची उपस्थिती असल्याचे संकेत मिळाले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या उत्खननाचे कंत्राट मायनिंग टेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले आहे.
वर्षभराचा करार
किल्लारहट्टी येथील उत्खननासाठी १० महिने आणि चिन्नीकट्टी येथील कामासाठी १२ महिन्यांचा करार निश्चित झाला असून, यासाठी ८.३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने हावेरी जिल्ह्यात सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या वेळी त्यांना यश मिळाले नव्हते. आता केंद्राने परवानगी दिली असली, तरी राज्याच्या वन खात्याकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
खासदाराकडून स्वागत
रायचूरचे खासदार जी. कुमार नाईक यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, रायचूर आणि कोप्पळमध्ये सोन्याच्या उत्खननाला परवानगी मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. असे प्रकल्प या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात. तसेच, पर्यावरणाला धोका न पोहोचवता उद्योगविकासाला चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.