मुंबई :- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.मदतीचे लवकरच वाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.
तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर टीकास्त्र सोडलं. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. असं राजू शेट्टी म्हणाले.