अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आजवर आपण कुत्रे, रानडुकरे, बिबट्या यांच्या मानवावर झालेल्या हल्ल्याच्या घटना वाचल्या असतील. मात्र आता जंगलातील लांडगे देखील मनुष्यवस्तीकडे आपली वाटचाल करत मानवावर हल्ले करू लागले आहे.
जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात दिसत आहे. पठारभागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगेदरा येथे लांडग्याने धुमाकूळ घालत आज्जीचे बोट तोडत नातीलाही गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान मानवाबरोबरच या लांडग्यांनी चार जनावरांवरही हल्ला केल्याने परिसरात कमालीची भीती पसरली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, रणखांबच्या लांडगेदरा येथील गोरख रंगनाथ गुळवे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.
शुक्रवारी दुपारी त्यांची पत्नी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघी घरासमोरील अंगणात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक लांडग्याने हल्ला चढवत आज्जी चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडत हाताच्या पंज्यालाही जोराचा चावा घेतला. त्यानंतर लांडग्याने जवळच असलेल्या ऋतुजावरही जोरदार हल्ला चढवत तिच्या मानेवर, चेहर्यावर व हाताला गंभीर दुखापत केली.
त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाल्या होत्या. मात्र, आज्जीने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेत लांडग्याला पिटाळून लावले. त्यानंतर लांडग्याने परिसरातील शेतकरी अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू आणि शेळीवर हल्ला करत त्यांनाही गंभीर दुखापती केल्या.
लांडग्याने रणखांब परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी वन विभागाकडे या जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे होणारा संचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved