अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्या विश्वासाने ग्रामविकास मंत्रिपदाची व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करीत गटबाजीला थारा न देता जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
प्रलंबीत असलेले रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी ठाम ग्वाही देत शेतकरी, कामगार, शेतमजूर, बेरोजगार आणि निराधारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजकारण हीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गदर्शक म्हणून दिलेली शिकवण आहे त्यानुसारच कार्य चालू राहील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिल्यानंतर राजकीय व सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देखील सोपविण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित इमारतीसाठी २२ कोटींचा निधी, साकळाई व तुकाई सारख्या प्रस्तावित सिंचन योजना, कुकडी कालवा दुरुस्तीसाठी निधी, बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधी,
ग्रामीण रस्त्यांची कामे, आरोग्यविषयक सुविधा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीच्या कामांना गती या प्रलंबित प्रश्नांची आव्हाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ सैनिक आणि पवारांच्या पडत्या काळातही सोबत करणारा कडवा शिलेदार ही मुश्रीफ यांची राजकारणातली ओळख आहे. शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या सहकाऱ्यात हसन मुश्रीफ अग्रभागी आहेत. आघाडीच्या सरकारमध्ये मुश्रीफांना कामगार मंत्रीपद मिळाले होते.
आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाच्या शर्यतीत अनेकजण होते. त्यातही तीन पक्षात मंत्रिपदाची विभागणी होती. या साऱ्या घडामोडीतही मुश्रीफ यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. राजकीय घडामोडीत मध्यस्थानी असलेल्या नगर जिल्ह्यावर पवारांचे नेहमीच लक्ष राहिले आहे. या जिल्ह्याच्या पालकमंत्री धुरा आता ना.मुश्रीफ यांच्याकडे आली आहे.