आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. 

त्यांच्यावर उद्या रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.

दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. श्री. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected] 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment