अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने चुकीची माहिती पसरविणे अनेक महाभागांना महागात पडले आहे. महाराष्ट्र सायबरने मार्च महिन्यात तब्बल ५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सर्वाधिक गुन्हे हे सातारा, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेकडून व्हॉट्सॲप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह यूट्यूबवर वॉच ठेवण्यात येत आहे.
चुकीची पोस्ट, व्हिडीओ आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
समाज माध्यमातून या व्हायरस संदर्भात ज्या काही अफवा पसरविण्यात येत होत्या, त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरला विशेष निर्देश देत तातडीने अशा समाजविघातक घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सायबर टीमने सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले.
त्यामध्ये केंद्र सरकारचा हवाला देत सोशल मीडियावर लॉकडाऊन संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या पोस्टमध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पाचपेक्षा जास्त कर्मचारी न ठेवण्याचे निर्देश दिले होते.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. या पोस्टच्या मुळाशी जात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल केला.
यानंतर यूट्यूब, व्हॉट्सॲप, व्टिटर आणि टिकटॉकवरही कोरोना व्हायरस संदर्भात समाजात चुकीच्या पद्धतीने भीतीचे वातावरण तयार होईल, अशा पद्घतीने पोस्ट व्हायरल होत असल्याचे आढळून आल्यानंतर ३० मार्चअखेर जवळपास ५१ गुन्हे समाजविघातक घटकांवर दाखल केले आहेत.
यामध्ये बीड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, भंडारा, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणी प्रत्येकी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com