हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी

Published on -

वर्ध्यातील हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. 

पिडितेनं गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती,

त्यानंतर आज सकाळी (सोमवार 10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये 3 फेब्रुवारी रोजी आरोपी विकी नगराळेने तरुणीला जिंवत जाळलं. या हल्ल्यात शिक्षिका असलेल्या तरुणीचा चेहरा पूर्णत: भाजला होता. विकी नगराळे या नराधमाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.

 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजता ही तरुणी महाविद्यालयाकडे निघाली होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले होते. 

तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या लोकांना मदतीची याचना केली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र घडला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. 

पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती.

७ फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe