ऑनर किलिंग ! आई-वडिलांनीच केला मुलीचा खून, शवविच्छेदनात सर्व प्रकार उघड

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : समाजात आता नात्याला काहीच किंमत राहिली नाही की काय असा प्रश्न पडावा अशी घटना समोर आली आहे. बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच पोटच्या मुलीचा खून केला असल्याचे समोर ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

खून केल्यानंतर या घटनेला आत्महत्यांचे स्वरूप देऊन दिशाभूल करण्यात आली होती. परंतु शवविच्छेदनातून सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. समाजात होत असलेल्या बदनामीला कंटाळून आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना नांदेडमधील हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली. अंकिता रामराव पवार (वय १७) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून आई पंचफुलाबाई रामराव पवार आणि वडील रामराव पवार असे आरोपींची नावे आहेत. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे.

अधिक माहिती अशी : हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात पवार कुटुंब राहते. या कुटुंबातील मुलीचे परिसरातील एका युवकाशी प्रेम जुळले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीला समजावून सांगितले होते. तरी महिनाभरापूर्वी ती मुलासोबत पळून गेली होती.

तेव्हा घरच्यांनी पळून नेणाऱ्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. कसे तरी समजावून मुलीला परत घरी आणले. मात्र मुलीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. त्या मुलासोबत लग्नाचा अट्टाहास करत होती. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी कंटाळून, समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने, शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना अंकिताच्या कपाळावर, डोक्याच्या पाठीमागे विळ्याने वार करून खून केला. या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

दरम्यान, हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यावरून या मुलीचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीची आई पंचफुलाबाई रामराव पवार, वडील रामराव पवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe