अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सिन्नर : तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. डॉ. गोविंद एकनाथ गारे (४०) असे मयत डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. गोविंद गारे यांचे सोनांबे येथे स्नेहल हॉस्पिटल आहे. त्यांच्या रुग्णालयात शनिवारी सकाळी एक महिला पित्ताचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी आली होती. त्या वेळी डॉ. गारे यांनी विनयभंग करून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करीत पीडित महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून डॉ. गारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलीस हवालदार एच. के. गोसावी यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. दोन दिवसांपासून डॉ. गारे गायब होते.
सोमवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावर उद्योग भवनच्या समोर असलेल्या अशोका भवनच्या पाठीमागील गुलमोहर या सात मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.
या इमारतीमध्ये मयत डॉ. गारे यांची आत्या राहत असून, आत्याचे पती विष्णू गुरुळे यांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली. डॉ. गारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.