Maharashtra News : यावर्षी देशातील काही भागांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या काळात विजेच्या मागणीतही लक्षणीय वाढ होणार असून हे लक्षात घेऊन ऊर्जा मंत्रालय तशी सज्जता करत आहे.
उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी २६० गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याने भारत कोळशावर आधारित विजेवर जास्त अवलंबून राहण्याची शक्यता ऊर्जा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
नूतनीकरणक्षम क्षमता सतत वाढत असल्याने व्यस्त काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा केला जात आहे. याशिवाय सौरऊर्जेची मागणी पूर्ण करण्यातही मोठी मदत होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, मंत्रालयाने सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना, विशेषतः कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना त्यांच्या देखभाल योजना पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय गॅसवर आधारित वीजनिर्मिती केंद्रांना वीजनिर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
एप्रिल-जून या कालावधीत भारताला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला. देशाच्या मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय बहुतांश मैदानी भागात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेची लाट अपेक्षित आहे. देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या चार ते आठ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १० ते २० दिवस टिकू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
अशा परिस्थितीत ऊर्जा मंत्रालयाचा अंदाज आहे की, देशातील कमाल मागणी २६० गिगावॅटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील २४३ गिगावॅटच्या विक्रमी मागणीपेक्षा या वर्षीची मागणी जास्त असेल.
देशभरातील जलाशयांमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने यंदा जलविद्युत उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असेल. या स्थितीत कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प आणि सौरऊर्जा देशातील विजेच्या मोठ्या मागणीचा मोठा भाग पूर्ण करेल,
असेही या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग आणि मंत्रालयाचे उच्च अधिकारी गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील तीव्र उष्णतेच्या अपेक्षित परिस्थितीबाबत रेल्वे आणि कोळसा मंत्रालय, राज्य अधिकारी आणि ऊर्जा कंपन्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.