महानगर पालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे प्रसुतीसाठी दाखल महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाैकशीचे आदेश देऊन चार सदस्यीय समितीची स्थापना आयुक्त शंकर गोरे यांनी केली आहे. मनपाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डाॅ. सागर बोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
बोल्हेगाव भागात एक परप्रांतीय कुटुंब दहा वर्षांपासून नगरमध्ये वास्तव्यास आहे. हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी पश्चिम बंगालहून येथे आलेले असल्याची माहिती समजले.
या महिलेला प्रसुतीसाठी कै. देशपांडे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सोमवारी (८ नोव्हेंबर) सिझरची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान तीने एका बाळालाही जन्म दिला.
शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिला रक्त उपलब्ध करून देण्यात आले. परंतु, देशपांडे रूग्णालयात आयसीयु सुविधा नसल्याने तिला जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाची चाैकशी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
प्रसुतीनंतर झालेला मृत्यू व पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याबाबत चाैकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली.
या समितीत आरोग्य समितीचे अध्यक्ष डाॅ. सागर बोरूडे (अध्यक्ष), अतिरिक्त आयुक्त डाॅ. प्रदीप पठारे, डाॅ. प्रवीण डुंगरवाल, डाॅ. जयश्री राैराळे यांची नियुक्ती करण्यात आली.