एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-राज्यात सध्या वीजबिलांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. आता याच मुद्यावरून नेतेमंडळी देखील आक्रमक झाले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत.

शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे.

या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो.

आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे.

या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.