जावई पोलिसाने ‘अशी’ केली सासुरवाडीवर कारवाई !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 / कराड :- ग्रामदैवताच्या यात्रेनंतर बोकडांच्या मेजवानीने साजरी होणारी पाल जत्रा मेंढ (ता. पाटण) येथील गावकऱ्यांना भलतीच महागात पडली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असतानाही सायंकाळी सुरू असलेल्या या यात्रेवर पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने चुलींवर शिजणारे मटण तिथेच सोडून डोंगरातून सैरावैरा पळून जाण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.

याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आपल्या सख्या व चुलत सासऱ्यावर ढेबेवाडीच्या नवनाथ कुंभार या पोलीस कर्मचाऱ्याने कारवाई करून ‘ड्युटी फर्स्ट’चा संदेश दिला आहे.

या यात्रेसाठी स्थानिकांसह अन्यत्र पुनर्वसित झालेले काही धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिराच्या परिसरात दगडांच्या चुलींवर मटण व भात शिजत असल्याची व तेथे गर्दीही झाल्याची माहिती ढेबेवाडी पोलिसांना मिळाली.

त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, अशोक खवळे, गृहरक्षक दलाचे डाकवे व पानवळ आदींनी अचानक तेथे छापा टाकला.

पोलिसांना समोर पहाताच नैवेद्य दाखवायच्या तयारीत असलेल्या लोकांनी डोंगरातून, तसेच नदीतून पळ काढला. काही जण पोलिसांच्या तावडीत सापडले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ जणांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी तीन दुचाकी, स्वयंपाकाची पातेली व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment