अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना पक्षाने विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे.
गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहायचे.विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव गर्जे हे दुलेचांदगाव (ता. पाथर्डी, जि.नगर) चे रहिवासी आहेत.
गर्जे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सुरुवातीच्या काळात अकोले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आदिवासी भागात काम केले.
त्यांनतर प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. लातूर येथील भूकंपाच्यावेळी त्यांनी मेहनत घेऊन आपत्कालीन परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्याने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे लक्ष वेधले गेले.
त्यांच्या सेवेबद्दल त्यांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2000 साली प्रवेश केला. पुढे 2009 साली मनसेकडून शेवगाव विधानसभा लढविली.
पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2009 पासून आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
2014 मध्ये काही काळासाठी राज्यमंत्री दर्जा असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते.
गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.
प्रदेश कार्यालयात व पक्षात त्यांनी प्रशासन, निवडणूक नियोजन व पक्ष संघटना अश्या सर्व प्रकारच्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांना विधान परिषदेची बक्षीसी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.