अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : कोपरगावला मिळणारे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे व शेतीला ५ आवर्तने देण्यात यावीत. या आग्रही मागणीसह पालखेडचे पाणी कोपरगावच्या टेलपर्यंतच्या भागात मिळावे. तसेच कालवा समितीच्या बैठका शेतकऱ्यांसमवेत लाभक्षेत्रातच घेण्यात याव्यात, अशा मागण्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केल्या.
जलसंपदा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. १४) रोजी सकाळी त्यांच्या दालनात झालेल्या दारणा, गंगापूर, कडवा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत माजी आ. कोल्हे बोलत होत्या.
यावेळी कोल्हे पुढे म्हणाल्या, यंदाच्या वर्षी मात्र, गोदावरी खोरे धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. जायकवाडी धरणही काठोकाठ भरले आहे. दारणा धरणात ५ हजार ९५० दशलक्ष घनफूट, गंगापूर ४ हजार ६९७ दशलक्ष घनफूट, नांदूर मधमेश्वर २५५ दशलक्ष घनफूट, कडवा १ हजार ५७६ दशलक्ष घनफूट, मुकणे ६ हजार ४०९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.
त्यातच जानेवारी महिना अर्धा झाला आहे. तरी प्रमुख प्रकल्पांमधून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी झालेली नाही. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा उन्हाळ्यापर्यंत दोन ते तीन आवर्तने प्रमुख प्रकल्पांमधून शेतीसाठी देणे सहज शक्य होणार आहे.
तेव्हा पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाच आवर्तने देण्यात यावीत. त्याचबरोबर पालखेडचे पाणी मतदारसंघातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळावे व यापुढे कालवा समिती सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात याव्यात, अशा मागण्या माजी आ. कोल्हे यांनी ना. छगन भुजबळ यांच्याकडे केल्या आहेत.