लातूर :- महिला आणि तरुणींना जिवंत जाळल्याच्या घटना घडत असतानाच लातुरातही अशीच घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी घडली. शहरातील दीपज्योतीनगर येथे वास्तव्यास असलेल्या १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले असून यात तिचा संपूर्ण चेहरा जाळण्यात आला आहे.
तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी की, शहरातील दीपज्योतीनगर येथे वास्तव्यास असलेली १८ वर्षीय तरुणी गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास आपल्या घरी होती.
यावेळी अज्ञाताने तिच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकून पेटविले. यात तिचा संपूर्ण चेहरा जळाला असून ती १५ टक्के भाजल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला नेमके कोणी पेटविले? केवळ चेहरा जाळण्यामागे काय षड्यंत्र, हे मुलीच्या जबाबानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मोलमजुरी करणाऱ्या या तरुणीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून ती गंभीर जखमी असल्याने तिला बोलता येत नाही, त्यामुळे अद्याप जबाब नोंदविला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.