कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील नामांकित दवाखान्यात घडली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला.
यानंतर संबंधित रुग्णालयाने या रुग्णाचे आठ लाख रुपयांचे बिल केले. मुळात कोरोनावर औषधच अस्तित्त्वात नसेल तर मग खासगी रुग्णालये अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा दर कसा आकारु शकतात, असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. आठ दिवसांपूर्वी कोणतेही रुग्णालय या महिलेवर उपचार करायला तयार नव्हते.
त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला या रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तीन लाख रुपये भरण्यास सांगितले. सरकारने असे प्रकार रोखले पाहिजेत, असे यावेळी आठवले यांनी म्हटले.
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. या तुलनेत रुग्णालयांमध्ये कोरोना बधितांना उपचार मिळत नाहीत.
रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जे केवळ वृत्तमध्यमांसमोर मोठया घोषणा करून जनतेच्या डोळ्यांत आश्वासनांची धूळफेक असल्याची टीका आठवले यांनी केली.