Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचं ठरलं ! …अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण

Ahmednagarlive24 office
Published:

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करावी. अध्यादेशाचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्य शासनाने मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांच्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची अधिसूचना काढल्यानंतर मंगळवारी जरांगे-पाटील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते.

रायगडावरून उतरल्यानंतर पाचाड येथे त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आपण सरकारला वेळोवेळी आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले आहे.

मात्र मुदतवाढ देऊनही समिती काम करीत नाही. हैदराबाद गॅझेट स्वीकारलेले नाही. ते त्वरित स्वीकारावे. १८९४ ची जनगणना स्वीकारलेली नाही ती स्वीकारण्यात यावी. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी.

मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत ते १० फेब्रुवारीच्या आत मागे घेतले जावेत. फेब्रुवारीतील विशेष अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

सगेसोयऱ्यांबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे. केंद्रात जाण्याची भाषा चुकीची आहे, असा आक्षेपही जरांगे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. सर्वसामान्य गरीब मराठ्यांसाठी आरक्षण गरजेचे आहे. पुढे काय होईल ते मला माहीत नाही,

पण मी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.

रायगडावर नतमस्तक अनवाणी गड चढून केले अभिवादन
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आल्यावर प्रचंड ऊर्जा मिळते, इथे ऊर्जा मिळणार नाही तर कोठे मिळणार? इथली ऊर्जा ही विजय घेऊनच येते! असे उद्‌गार मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी आले असताना काढले.

मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर सर्वत्र मराठा समाजाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे. हे यश मिळताच जरांगे-पाटील यांनी किल्ले रायगडावर शिवरायांचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी उशिरा रात्री ते किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामासाठी दाखल झाले आणि मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी रायगडाच्या दिशेने कूच केली.

यावेळी त्यांनी रोपवे सुविधेचा वापर न करता संपूर्णतः गड अनवाणी चढून ते दुपारी अडीच वाजता राजदरबारी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी काही निवडक कार्यकर्ते व समाज बांधवांची फौज त्यांच्यासोबत होती.

यावेळी प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळांवरून त्यांना छेडले असता त्यांनी छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनादेखील ते धोकादायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे सगेसोयरे या शब्दावरून बोलताना त्यांनी, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी ‘सगेसोयरे’ या कायद्याची मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे एकही मराठा समाज बांधव हा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे ते म्हणाले.

किल्ले रायगडावर दर्शनासाठी आल्यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाल्याचे सांगत रायगडापेक्षा जगभरात कोणतेच मोठे दैवत नाही, असे बोलून रायगडा चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय आशीर्वाद घेऊन पुढे लढणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe