दारुच्या नशेत दररोज आई,पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील गुणवरे गावात घडली.
मुलगा सुभाष (३८ ) गाढ झोपेत असताना मध्यरात्री मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन वडिलांनी त्याला ठार मारले. या प्रकरणी मुलाचा पिता लक्ष्मण बाळू नाळे याला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष हा दारुच्या प्रचंड आहारी गेला होता. दारू पिऊन कुटंबीयांना त्रास देणे हे नित्याचेच झाले होते. त्याच्या त्रासाला घरातील सर्व लोक कंटाळून गेले होते, आई, वडील, पत्नी यांना रोजच मारहाण ही तो करीत होता.
तसेच फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील बहिण सुरेखा वसंत पवार यांना देखील तो सतत त्रास देत असे.अखेर शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वडील लक्ष्मण नाळे यांनी मुलगा सुभाष झोपेत असताना कुऱ्हाडीने घाव घातले.