अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई :- महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांच्या अदलाबदली सुरू झाली आहे.
सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर 30 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने यामध्ये तर अजून नव्यांची भर पडणार आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांचा आवडता “सेवासदन’ हा बंगला न मिळाल्याने ते नाराज होते. थोरात यांना मलबार हिल येथील ‘मेघदूत’ बंगला देण्यात आला होता, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी कमालीची नाराजी व्यक्त करत बंगल्याचा ताबाही घेतला नव्हता.
मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्यासह इतर सहा मंत्र्यांनाही बंगल्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारमधील महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील रॉयल स्टोन बंगला घेतला होता.
मात्र, तो ‘वर्षा’पासून बराच लांब असल्याने मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना तातडीने पोहोचायचे असल्यास ते सोयीचे ठरणार नसल्याने त्यांनी हा बंगला सोडला आणि पुन्हा त्यांचा आधीचाच नंदनवन बंगला घेतला आहे.
शिंदे यांनी रॉयल स्टोन बंगला सोडल्यानंतर साहजिकच नव्याने मंत्रिपदाची शपद घेणाऱ्या अनेकांचा या बंगल्यावर डोळा होता, मात्र, या मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याआधीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना मिळालेला मेघदूत बंगला सोडून रिकाम्या झालेल्या रॉयल स्टोनवर तातडीने ताबा मिळवला आहे.