शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्‍नाचे शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांना निवेदन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्‍नाच्या अनुषंगाने मुंबई येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांची बैठक पार पडली.

यामध्ये शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी संच मान्यता, शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित आश्‍वासित प्रगती योजना लाभ मिळण्यासह शिक्षकांच्या इतर प्रश्‍नांचे मुद्दे उपस्थित करुन सदर प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन ना. बच्चू कडू यांना देण्यात आले.

तर दोन वर्षाच्या प्रलंबित असलेल्या संच मान्यतेने मुंबईतील सुमारे दोन हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती वर्तवून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुंबईतील अनुदानित शाळांची संचमान्यता वेगळी करण्याची मागणी केली शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष शिवनाथ दराडे यांनी आग्रही मागणी केली असल्यची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शैक्षणिक सत्र 2013-14 पासून ऑनलाइन पद्धतीने संच मान्यता देणे सुरू झाली. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली माहिती सादर करताना फार मोठ्या प्रमाणात त्रुटी उणिवा राहिल्या आहेत. शिक्षणाधिकारी स्तरावर त्रुटी न सुधारता पाठविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात चुकीच्या पध्दतीने संच मान्यता देण्यात आल्या आहेत. या चुकीच्या संचमान्यतांची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार अपील करण्यात आली.

परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या संच मान्यतेची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्य अटी रद्द करून सर्व शिक्षकांना 12/24 वर्षांच्या सेवेनंतर सरसकट विनाअट वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी पदोन्नती समजून देण्यात यावी, यासाठी दि.5 सप्टेंबर 2007 चा शासन निर्णय रद्द करून शिक्षकांना 12/14 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी पदोन्नती समजून देण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावा,

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतना बाबत कार्यवाही करणे, नियमित वेतन होतील त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, शालार्थ आयडी बाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्या,

अनुदान वितरण आदेश निर्गमित करण्यात यावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासह खाजगी, अनुदानित शिक्षण संस्थांमधील सेवा निवृत्ती विषयक प्रलंबित प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बाबा बोडखे यांनी म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!