आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाणार !

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन दिला. त्यांच्याऐवजी इतर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची आग्रही मागणी केली गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील भाजपचे अनिल ताके, पोपट जिरे, डॉ. रावसाहेब फुलारी, कालिदास सानप, अप्पासाहेब साबळे, रामकिसन गर्जे आदींच्या शिष्टमंडळाने विखे आणि मुंडे यांची भेट घेऊन आमदार मुरकुटे यांना तालुक्यातून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यास स्पष्ट विरोध केला.

आमदार मुरकुटे यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारने तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी देऊनही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याने ही कामे अल्पावधीत कुचकामी ठरल्याने सरकारप्रती चुकीचा संदेश गेल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला.

केंद्र व राज्यात स्वपक्षाचे सरकार असतानाही आमदार मुरकुटे यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना ‘बळ’ देऊन तालुक्यातील पक्षसंघटना मोडकळीस काढल्याचा आरोप त्यांनी केला. युतीच्या कार्यकर्त्यांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी त्यांची विशेष सलगी राहिल्याने २०१४ च्या विधानसभेनंतरच्या साखर कारखाने, नेवासे बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रचंड पिछेहाट झाल्याकडे या शिष्टमंडळाने विखे, मुंडे यांचे लक्ष वेधले.

तालुक्यातील गडाख-घुले या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांशी आमदार मुरकुटे यांनी अंधारात हातमिळवणी करून युतीच्या लढाऊ, तसेच संघर्षशील कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिल्याचा सनसनाटी आरोप शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ निवडीतील झालेल्या गोलमालाचे उदाहरण देऊन त्यांनी यावेळी केल्याने हे मंत्रीद्वय अवाक् झाले. आमदार मुरकुटे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास नेवासे तालुक्यातील भाजप-सेना-आरपीआय महायुतीचे निष्ठावान कार्यकर्ते कुठलीही किंमत मोजावी लागली, तरी काम करणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी या वेळी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment