आ.बाळासाहेब थोरातांपुढे जिल्ह्यात कॉंग्रेस टिकविण्याचे आव्हान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांच्या झंझावातापुढे साऱ्यांचाच पाला पालापाचोळा झाल्याचे चित्र निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. 

फक्त अकोल्याचा गड शाबूत राखण्यामध्ये पिचड पिता-पुत्रांना यश आले. हा अपवाद वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघांत विखे यांचा झंझावात विरोधी पक्षातील सर्वांना नेस्तनाबूत करून गेला, हे मान्यच करायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी लाटे’चा प्रभाव देशभर होता. या मोदी लाटेचे “त्सुनामी’त रूपांतर करीत विखे यांनी या मोदी लाटेला पूरक भूमिका बजावली. 

आणि एकेकाळी कॉंग्रेसचा असणारा हा बालेकिल्ला आज भाजप – सेनेचा झाला असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

नगर दक्षिणेत गेल्या दोन वेळेत भाजपचे माजी खा.दिलीप गांधी आणि यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी विजय मिळवत भाजप ची हॅट्ट्रिक झाली आहे. 

तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांत 2009 साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यानंतर 2014 आणि यावेळी पुन्हा सदाशिव लोखंडे यांच्या मुळे शिवसेनेही हॅट्ट्रिक केली आहे. 

डॉ. सुजय यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी पक्की केली. गेले तीन वर्षे मतदार संघाची केलेली पाहणी त्यांना कामाला आली.

त्यांच्या मदतीला आई शालिनीताई व पिता माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. नगर दक्षिणचे मतदान झाल्यानंतर 23 एप्रिलला त्यांनी आपल्या प्रचाराचा लवाजमा उत्तरेकडे हलविला.

उरलेल्या सहा दिवसांमध्ये विखेंचा झंजावात सर्व दिशांनी अक्षरशः आपले अस्तित्व दाखवून गेला.

आगामी काळात माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

पाच-सहा महिन्यांच्या उर्वरित काळामध्ये त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळणार आहे. 

आणि या मंत्रिपदाच्या काळामध्ये ते नगर जिल्ह्याचे राजकारण पुत्राला व युतीच्या कार्यकर्त्यांना जोडीला घेऊन ढवळून काढतील हे सांगण्याला ज्योतिषाची गरज भासणार नाही.

एवढेच नव्हे शिर्डी आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली मजबूत फळी उभी करून आगामी निवडणुकीची गणिते ते मांडण्याला सुरुवात करतील हे निश्‍चित आहे.

लोकसभा निवडणूक आणि निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कॉंग्रेस सुपडा साफच झाला आहे. पक्षांतर्गत वादामुळे अधीच अडचणीत असलेली कॉंग्रेस आता तर पूर्णपणे अस्तित्वहिन होण्याच्या मार्गावर आहे.

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कॉंग्रेस सोडली नसली तरी ते कॉंग्रेसमध्ये नसल्यातच जमा आहे.

त्यामुळे आता माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी येऊन पडली असून जिल्ह्यात कॉंग्रेसला संजीवणी देण्याचे मोठे आव्हान आ. थोरात यांच्या समोर उभे ठाकले आहे.

आ. थोरातांना आता दक्षिणेसह उत्तरेलाही बळकटी देण्याचे काम करावे लागणार असून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष निवडीपासून संघटना बांधणीचे कामे सुरू करावे लागणार आहे.

आज नगर शहर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, राहाता, कोपरगाव, नेवासा, नगर, कर्जत, जामखेड, या दहा तालुक्‍यात बोटावर मोजता येईल एवढेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते राहिले आहेत.

श्रीगोंदा, अकोले, श्रीरामपूर या तालुक्‍यात काय ती थोडी कॉंग्रेस प्रभावी दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केला तर आ. थोरातांना जिल्ह्यात कॉंग्रेस वाढीसाठी वेळ द्यावा लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन ते तीन आमदार निवडून आले तर कॉंग्रेसला संजीवणी मिळेल. परंतु आ. थोरातांना आजवर पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला.

पण आता विरोधी पक्षांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. त्यात सत्ताधारी भाजप व शिवसेना असा हा संघर्ष करतांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात सध्या तरी आ. थोरात यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता नाही की जो पक्ष सावरू शकेल. त्यामुळे त्यांना आता पुढाकार द्यावा लागणार आहे.

अर्थात थोरात यांच्याकडे राज्यपातळीवरील जबाबदारी देखील पडण्याची शक्‍यत आहे. त्यामुळे राज्यसह जिल्ह्याला उभारणी देण्याची कसरत आता त्यांना करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment