अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात नामांतराचा मुद्दा आता राजकीय वळण घेऊ लागला आहे. हळूहळू याच मुद्द्यावरून राजकीय पक्ष आक्रमक भूमिका स्वीकारत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
नुकतेच नगर शहरात मनसेच्या वतीने नामांतराचा विषय छेडण्यात आला होता. आता त्याच पाठोपाठ श्रीरामपूरमध्ये देखील याच मुद्याने आता जोर धरला आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती ‘संभाजीनगर’ करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
श्रीरामपूरचे ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी श्रीरामपूर बसस्थानकात व बसेसवर छत्रपती ‘संभाजीनगर’ नावाचे फलक लावून औरंगाबादचे नामकरण छत्रपती ‘संभाजीनगर’ करावे यासाठी आंदोलन केले.
26 जानेवारीपर्यंत औरंगाबादचे नामकरण छत्रपती ‘संभाजीनगर’ झाले नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मनसैनिकांनी श्रीरामपूर बस स्थानकातून औरंगाबादकडे जाणार्या बसेसवर छत्रपती ‘संभाजीनगर’ नावाचे फलक लावून, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’, ‘आघाडी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणार्या आघाडी सरकार व त्यांच्या मंत्र्यांचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved