८ फेब्रुवारी २०२५ पुणे : पुणे विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पुण्यात पार पडली.या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३६ जिल्ह्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.या ३६ जिल्ह्यांमध्ये गेल्या वेळी १८ हजार कोटींचा निधी दिला होता.या वेळी त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले.
या बैठकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, जयकुमार गोरे उपस्थित होते.या चारही मंत्र्यांच्या उपस्थिती बद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता पवार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन समितीची बैठक ही महत्त्वाची असते.त्यात एकाच दिवशी मी पुण्यातील विधानभवन या ठिकाणी यासंदर्भात बैठकीचे निमंत्रण सर्वांना पाठवले होते.त्यानुसार ही मंडळी बैठकीला उपस्थित होती.
त्यांच्याकडून काही चांगल्या सूचना मिळाल्या आहेत.त्यानुसार, पुणे विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांतील नियोजन समितीच्या आराखड्याबाबत चर्चा झाली असून येत्या मंगळवार पर्यंत ३६ जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे.हा आढावा घेतल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक करणार आहे. त्यानंतर १८ हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी वाटप केला जाणार आहे.त्यात महायुतीमधील कोणत्याही आमदारांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंवर टीका
आठ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला एक जागा मिळाली, तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. जिद्दीने कामाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत यश संपादन केले. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला तुमचा मुलगाही निवडून आणता आला नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या पक्षावर टीका केली होती.लोकसभा निवडणुकीत एक जागा मिळालेल्या अजित पवारांच्या पक्षाचे ४२ आमदार निवडून येतातच कसे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या सवालाबाबत पत्रकारांनी मुद्दा उपस्थित केला.त्या वेळी अजित पवार म्हणाले, मनसेची ताकद होती, तर त्यांना त्यांच्या मुलालासुद्धा निवडून आणता आले नाही, मात्र पराभव झाल्यानंतर उगीच रडत बसण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.