अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तनपुरे साखर कारखान्यास जिल्हा बँकेने विखे पिता-पुत्रांच्या मध्यस्थीमुळे कर्ज दिले आहे. पण कर्ज परतफेडीच्या करारानुसार कारखान्याकडून पैसे आले नसल्याने सुमारे ३० कोटींवर रक्कम थकल्याने बँकेने पैसे भरण्याबाबतची नोटीस कारखान्याला पाठवली होती.
या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष गायकर व संचालक मंडळ सदस्य आणि राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी ‘तनपुरे’च्या थकीत कर्जाची वस्तुस्थिती मांडली होती. या वेळी त्यांनी विखे पिता-पुत्रांवर टीकाही केली होती.
‘डॉ. विखेंना लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून त्यांचा तनपुरे कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न होता व त्यासाठी जिल्हा बँकेने मदत करावी म्हणून या दोघांनीही माझ्याकडे आग्रह धरला होता,’ असे कर्डिलेंनी त्या वेळी स्पष्ट केले होते.
या आरोपाला विखे पिता-पुत्रांकडून लगेच प्रत्युत्तर दिले गेले नाही; पण गुरुवारी ‘तनपुरे’च्या कामगारांच्या पगारासाठी सुरू असलेल्या उपोषणातून मार्ग काढण्यासाठी डॉ. विखे राहुरीला गेले होते व तेथे उपोषण सुटल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्डिले व गायकरांना लवकरच योग्य उत्तर देण्याचे सूतोवाच केले.
‘लोकसभा निवडणुकीपुरता राहुरीचा तनपुरे कारखाना सुरू करण्यात विखे पिता-पुत्रांना रस होता,’ या माजी आमदार शिवाजी कर्डिले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी खासदार डॉ. सुजय विखेंनी सुरू केली आहे. ‘येत्या एक-दोन दिवसांत कर्डिले व गायकर यांना योग्य ते उत्तर दिले जाईल,’ असे डॉ. विखे यांनी गुरुवारी राहुरीत स्पष्ट केले.]
लवकरच आपली पुढील भूमिका मांडणार – डॉ. विखे
‘कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने जिल्हा सहकारी बँकेकडून एक रुपयाचेही कर्ज घेतलेले नाही, त्यामुळे कोणत्या अधिकाराखाली बँक संचालक मंडळावर कारवाई करणार?,’ असा सवाल करून डॉ. विखे म्हणाले, ‘आमच्या काळातील कामगारांची देणी देण्यास आम्ही बांधील आहोत, असे असताना चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे लवकरच याबाबत आपली पुढील भूमिका मांडणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.