MSRTC : एसटी महामंडळाने आपल्या चालकांच्या शिस्तबद्धतेसाठी एक ठोस निर्णय घेतला आहे. चालकाने जर वाहतुकीचे नियम मोडले आणि त्यामुळे दंड ठोठावला गेला, तर तो दंड आता थेट संबंधित चालकाच्या पगारातून कपात करण्यात येणार आहे. यामुळे चालकांमध्ये वाहतूक नियमांचे अधिक काटेकोर पालन होईल, अशी अपेक्षा महामंडळाकडून व्यक्त होत आहे. बदलत्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि शिस्तीचा विचार करून हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन
एसटी चालक प्रामुख्याने नियमांचे पालन करतात. मात्र, अनेकदा वाहतुकीच्या घाईगडबडीत, तणावाखाली किंवा नकळतपणे काही चुका होतात. यात सिग्नल तोडणे, चुकीच्या लेनमध्ये बस चालवणे किंवा अचानक लेन बदलणे यांसारखे प्रकार समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत आरटीओ किंवा महामार्ग पोलिसांकडून बसवर दंड आकारला जातो. याआधी दंडाची रक्कम महामंडळाने स्वतः भरली जात होती, परंतु आता ती थेट चालकाच्या पगारातून वसूल केली जाणार आहे.

स्पीड लॉकमुळे वेगावर नियंत्रण
एसटी महामंडळाच्या सर्व बसेसना प्रतितास ८० किलोमीटरचा स्पीड लॉक बसवलेला आहे. त्यामुळे बस अति वेगाने धावत नाहीत आणि वेगाच्या उल्लंघनाच्या घटना कमी झाल्या आहेत. मात्र, लेन कटिंग किंवा सिग्नल उल्लंघन यासारख्या नियमभंगाचे प्रकार अजूनही अधूनमधून घडतात. यामुळे महामंडळाने आता चालकांवर अधिक जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुभवी चालक विरुद्ध नवखे चालक
ज्येष्ठ आणि अनुभवी चालक नियमांचे पालन करताना अधिक दक्ष असतात. त्यांच्या विरोधात दंडाची नोंद फारशी होत नाही. मात्र, नव्याने भरती झालेल्या तरुण चालकांकडून नियमभंगाची प्रकरणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. यामुळे नवीन चालकांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यावरही भर दिला जात आहे. त्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील.
दंड वसुलीचीप्रक्रिया
जेव्हा एखाद्या एसटी बसने वाहतूक नियम मोडला तर आरटीओ किंवा पोलिसांकडून त्या बसच्या क्रमांकावर दंड आकारला जातो. बस क्रमांकाच्या आधारे त्या दिवशी बस चालवत असलेल्या चालकाची ओळख पटवली जाते. नंतर महामंडळ थेट त्या चालकाच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करते. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही गैरसमजाला वाव देणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.शिवाय, जास्त दंड करणाऱ्या चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचारही प्रस्तावित आहे. त्यामुळे चालकांनी नियम पाळून प्रवाशांचा आणि स्वतःच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करणे आवश्यक आहे.