मुंबई महाराष्ट्राची होती… आणि आहे… सावदी यांना अजित पवार यांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे असेही अजित पवार म्हणाले. ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवार यांनी ‘ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्या भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते.

नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.