अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई व परिसरातील महानगरांमध्ये किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचे आपले लक्ष्य असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. मुंबईस्थित पारनेरकरांनी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामोठे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात लंके बोलत होते.
माजी सभापती सुदाम पवार अध्यक्षस्थानी होते. सतीश पाटील, रामदास शेवाळे, सुरदास गोवारी, राजेंद्र चौधरी, गोरख आहेर, राहुल झावरे, विजय औटी, भाऊ पावडे, नितीन चिकणे या वेळी उपस्थित होते. लंके म्हणाले, मुंबई व परिसरातील महानगरांमध्ये पारनेर तालुक्यातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकांमध्ये आपले हक्काचे नगरसेवक असणे आवश्यक आहे.
त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचे आपले लक्ष्य आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतः गाडून घेतले, तर जनता तुम्हाला डोक्यावर घेते. लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध महानगरांंमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले असून आगामी निवडणुकांमध्ये मतदार आपल्या विचारांच्या उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच आपण यश संपादन करू शकलो. निवडणुकीतील यशानंतर आता तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. सामान्य कामासाठी मुंबईकरांनी आता गावाकडे येण्याची गरज नाही. माझ्याशी संपर्क करा, तुमचे काम मार्गी लावण्याची जबाबदारी माझी असेल.
विजय स्वप्नवत असला, तरी मी आजही जमिनीवर आहे, उद्याही राहील, अशी ग्वाही देतानाच तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण हे मूलभूत प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मार्गी लावणार आहोत. मंत्रिपदापेक्षा मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.