अहमदनगर :- शेवगाव तालुक्यातील तेजस्वी सातपुते यांची नुकतीच साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
मीरा बोरवणकर यांनी 3 जुलै 1996 रोजी सातारा पोलिस अधिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर साताऱ्याला लाभलेल्या या दुसऱ्या महिला पोलिस अधिक्षक आहेत.
तेजस्वी यांनी लहानपणी पायलट व्हायचे स्वप्न पाहिले होते पण चष्मा लागल्याने पायलट होता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने त्यांच लहानपणी स्वप्नभंग झाले.
पण जिद्द न सोडता एलएलबी करताना युपीएससीच्या परिक्षेच्या माध्यमातून आयएएस व आयपीएस होता येते हे त्यांना समजले. त्यामुळे पायलट होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून नवीन दिशा दिसली.
त्यामुळे त्यांनी एलएलबी दुसऱ्यावर्षातच सोडून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला आणि तेजस्वी सातपुते या आयपीएस झाल्या.
बारावी पूर्ण केल्यानंतर बायोटेक्नॉलॉजीतून बीएसस्सी करताना बंगलोरच्या मोठ्या संस्थेत प्रोजेक्ट ओरिएंटेड बायोलॉजिकल प्रकल्पासाठी त्यांची निवड झाली. सलग तीन वर्षे सुट्टीत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता.
संपूर्ण भारतातून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होते. पण त्यांना हे करायचे नव्हते त्यामुळे त्यांनी हे सोडून दिले. त्या परत आल्या. तोपर्यंत सर्व ऍडमिशन संपले होते.
त्यावेळी केवळ एलएलबीचा प्रवेश शिल्लक होता. त्यामुळे त्यांनी आयएलएस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. शिकत असताना दुसऱ्या वर्षी काही मुले सातत्याने वृत्तपत्र वाचत बसलेली दिसायची. त्यामुळे त्यांना याबाबत विचारले.
आम्ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतोय, असे सांगितले. या परिक्षा दिल्यानंतर एसपी आणि कलेक्टर होता येते असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पायलट होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांना प्रथमच यामाध्यमातून नवीन दिशा दिसली.
त्यानुसार त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्याचे ठरविले. एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांनी स्पर्धा परिक्षा दिली. त्यात त्या अत्यंत कमी मार्काने नापास झाल्या.
त्यावेळी त्यांना विश्वास आला की अभ्यास करून आपण चांगले मार्क मिळवू शकतो. पूर्णवेळ अभ्यास केला तर नक्की यशस्वी होऊ.
त्यामुळे एलएलबी सोडून त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. दुसऱ्याच प्रयत्नात त्या युपीएससीची परिक्षा पास झाल्या.
आयपीएस परीक्षेत 198 वा नंबर मिळवून आयपीएस अधिकारी बनलेल्या तेजस्वी यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती परतूर येथे झाली होती.
त्यानंतर त्यांनी काही काळ राज्य गुप्तवार्ता विभागात टेक्निकल सव्हिसेस प्रशिक्षणाच्या अधिक्षक म्हणून काम पहिले.
तसेच पुणे ग्रामीण मध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून त्यांनी याआधी काम केलेले आहे. याआधी 7 महिने त्या पुणे आयुक्तालयात वाहतूक उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.
पुणे शहरात हेल्मेट सक्ती, कमीत कमी होर्नचा वापर करण्यासाठी तरुणाईला प्रोत्साहन देणे तसेच वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती व समोपदेषण कार्यशाळा आयोजित करणे यासारखे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले.
एक कडक शिस्तीच्या, धडाडीने काम करणाऱ्या, प्रसंगी कठोर निर्णय घेणाऱ्या कर्तव्यनिष्ठ महिला पोलिस अधिकारी म्हणून त्या प्रसिध्द आहेत.
तसेच आजच्या काळात पोलिस खात्यामध्ये भरती होणाऱ्या अनेक तरुणींच्या त्या रोल मॉडेल आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना अहमदनगर लाइव्ह 24 व सर्व नगरच्या जनतेकडून शुभेच्छा..!!!