Nagpur Metro Update: नागपूरकरांना मिळणार लवकरच मेट्रोची भेट! 6708 कोटींची तरतूद, वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
nagpur metro update

Nagpur Metro Update:- महाराष्ट्रामध्ये सध्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपुले तसेच मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

मुंबई आणि पुण्याचा विचार केला तर या ठिकाणी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगात सुरू असून मुंबईच्या खालोखाल पुण्यात देखील त्या पद्धतीने मेट्रोची कामे वेगात सुरू आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे शहर देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

नागपूर शहराचा विचार केला तर  आतापर्यंत मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरू असून 40 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे विकसित करण्यात आलेले आहे व नागपूर मेट्रो रेल्वेचा 43 किलोमीटरचा दुसरा टप्पा देखील लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता असून मिळालेल्या माहितीनुसार दुसरा टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा असेल 43 किलोमीटरचा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 40 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आले असून 43 किलोमीटरचा दुसरा टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेमध्ये दिली.

रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी लोकसभेमध्ये याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत प्रश्न विचारताना खासदार कृपाल तुमाने यांनी प्रत्येक राज्यामध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्कची लांबी किती आहे व त्याचा तपशील काय आहे?

यासोबतच राज्य व केंद्रशासित प्रदेश तसेच शहर निहाय तपशिल आणि विलंबाची कारणे तसेच मेट्रोची प्रलंबित प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता व त्यांना किती वेळ लागेल? इत्यादी प्रश्न केंद्रीय मंत्री हरदीपसिंहपुरी यांना विचारण्यात आले होते.

 केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काय म्हटले?

या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, मेट्रो रेल धोरण 2017 च्या अनुषंगाने केंद्र सरकारला राज्य सरकारकडून जेव्हा प्रस्ताव सादर केला जातो तेव्हा त्याची व्यवहार्यता आणि उपलब्ध संसाधनांची शक्यता यावर अवलंबून शहरे किंवा शहरी भागातील मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक मदतीचा विचार केला जातो.

यामध्ये नागपूर शहरातील मेट्रोचा जो काही दुसरा टप्पा आहे तो मिहान ते एमआयडीसी ईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर असा एकूण 43.80 किलोमीटरचा असणार आहे. त्याकरिता 6708 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती देखील केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.

त्यामुळे नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मात्र नागपूर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe