नाशिक , अहमदनगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात विदर्भ वगळता अन्यत्र पावसाची अवकृपा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच पाण्याचे वांधे झाले असून, शेकडो टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जात आहे.

चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

नगर-नाशिकमधील भंडारदरा, नांदूर-मधमेश्वर, भाम, भावली व बालदेवी ही छोटी-मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. मात्र, निळवंडे, मुळा, दारणा, मुकणे या धरणांत ८० ते ९० टक्के पाणी आहे. पाऊस झाला नाही तर ही धरणे भरण्याची शक्यता तर कमी आहेच, शिवाय सध्याच्या साठ्यातूनही जायकवाडीला पाणी देण्याची शक्यता आहे.

पुरेशा पावसाअभावी यंदा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असताना उर्ध्व भागातील धरणांतील जलसाठ्याचा रब्बी हंगामात लाभ होण्याची आशा धुसर होण्याच्या मार्गावर आहे. कारण तहानलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक, नगरमधून यावर्षी पाणी सोडावे लागणार आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पाऊस होऊन जायकवाडीचा साठा ६५ टक्के न झाल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आताच घाई करू नये, अशी मागणी नगर जिल्ह्यातून करण्यात येत आहे.

मराठवाड्याची २०१८ साली १२ टीएमसीची मागणी होती, तेव्हा नियमाने साडेसहा टीएमसी पाणी द्यावे लागले होते. यंदा तर नाशिक व नगर जिल्ह्यातून किमान नऊ टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील पाणीवाटपाभोवती संघर्षाचे ढग दाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणांतर्गत मोठे, मध्यम, लघु व कोल्हापूर टाइप असे एकूण १९८ बंधारे आहेत. या सर्व जलाशयांचा उपयुक्त पाणीसाठा १०५ टीएमसी असला तरी सध्या या प्रकल्पांमध्ये ७९.७३ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे.

म्हणजेच २५.२७ टीएमसी पाणी कमी आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५१४० दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के जलसाठा झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला असला तरी जायकवाडीत ३५ टक्के जलसाठा असल्याने समन्यायी पाणी वाटप तत्त्वामुळे हंगाम संपुष्टात आल्यानंतर गंगापूरमधून पाणी सोडावे लागते की काय, अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पुढील काळात पावसाची हुलकावणी कायम राहिल्यास केवळ गंगापूरच नव्हे, तर वरील भागातील अन्य धरणांमधून जायकवाडीला पाणी द्यावे लागणार आहे. यावर्षी घाटमाथा परिसर वगळता इतरत्र दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम स्वरूपातच तो हजेरी लावत आहे. या स्थितीमुळे जुलैत तुडुंब होणारी धरणे यंदा टेंबरच्या पूर्वार्धातही भरू शकलेली नाहीत. मध्यंतरी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील पावसामुळे तालुक्यांच्या पाणलोट क्षेत्रातील धरणांचा जलसाठा काहीसा उंचावला.

त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पातळी ९१ टक्क्यांवर पोहोचली. हंगामाला अडीच महिने होण्याच्या मार्गावर असताना आजतागायत गोदावरीतून एकही पूर गेलेला नाही. गंगापूर धरण तुडुंब होण्याच्या स्थितीत आल्यामुळे शहराची पाण्याची चिंता मिटणार आहे. तथापि, अपुऱ्या पावसाने वरील भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचे नवीन संकट उभे ठाकणार आहे.

दरवर्षी नाशिक व नगर जिल्ह्यातील पूरपाणी जायकवाडीच्या जलसाठ्यात लक्षणीय भर घालते. यंदा धरणांमधून फारसा विसर्ग झालेला नाही. पूरपाणी गेले नाही. त्यामुळे पाणी वाटप धोरण क्रमांक २ चा अवलंब होऊ शकतो. त्यानुसार जायकवाडीत ५४ टक्के जलसाठा असल्यास गंगापूरमध्ये ७४ टक्के जलसाठा ठेवता येईल.

म्हणजे या धरणातून उर्वरित पाणी जायकवाडीला सोडावे लागेल. धोरण क्रमांक ३ नुसार जायकवाडीचा जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत गेला, तर गंगापूरमध्ये ८८ टक्के जलसाठा राखून उर्वरित पाणी सोडावे लागेल. हंगामाच्या अखेरीस जायकवाडीत किती जलसाठा होतो, यावर वरील धरणांमध्ये किती जलसाठा राहील याचे समीकरण निश्चित होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe