अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे.

दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी बिघाडी झाली आहे.

अहमदनगरमध्ये कालच काँग्रेसने भाजपाचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

विखेंचे समर्थक असलेल्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र कांबळेंनी विखेंची साथ सोडत बाळासाहेब थोरातांचा हात धरला आणि आपली उमेदवारी जाहीर करून घेतली.

मात्र यामुळे त्यांच्या श्रीरामपूर मतदारसंघातील विखे समर्थक नाराज झाले आहेत. श्रीरामपूर आज येथे पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे यांच्या अध्यक्षतेखाली विखे समर्थकांचा मेळावा झाला.

या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे दोन सदस्य,  पंचायत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, नगरपालिकेचे 13 नगरसेवक, 22 गावातील सरपंच आणि सदस्य यासह शेकडो विखे समर्थक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विखे पाटलांची साथ सोडणाऱ्या कांबळेंना मदत करायची नाही ही भूमिका सगळ्यांनी घेतली.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर थोरातांनी थेट राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्यामुळे विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेला आहे.

थोरातांकडून विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना विखेंकडूनही थोरातांच्या राजकारणाला शह दिला जातोय. मात्र या दोघांच्या राजकारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत सापडल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment