नेवासे : पंचायत समितीच्या सोनई गणाची पोटनिवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कारभारी डफळ यांनी भाजपच्या प्रकाश शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव केला.
भाजपचा धुव्वा उडण्यास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे खापर फोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणींत वाढ होणार आहे.
नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सभापतिपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
राजकारण न करता ही निवडणूक बिनविरोध करण्याची लोकभावना होती. तथापि, माजी आमदार शंकरराव गडाख यांची राजकीय कोंडी करण्याच्या हेतूने आमदार मुरकुटे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही निवडणूक लोकांवर लादल्याचा आरोप करण्यात येत होता.
मुरकुटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून अटीतटीच्या लढतीचे भ्रामक चित्र उभे केले होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या दारुण पराभवाने त्यांनी ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेतल्याची चर्चा तालुक्यात आहे.
पोटनिवडणुकीत क्रांतिकारीच्या कारभारी डफळ यांना ८२६४, तर भाजप उमेदवार प्रकाश शेटे यांना ४९७५ मते मिळाली. नोटाला २१३ मते मिळाली. डफळ यांनी शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव करून भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वल्गना किती पोकळ होत्या ते दाखवून दिले.
- अहिल्यानगरमधील भाजपाच्या तालुकाध्यक्ष निवडीतील गटबाजीचा वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारींचा पाऊस
- पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी क्षमता असणारे टॉप 5 मेट्रो स्थानक कोणती ? पहा संपूर्ण यादी
- अहिल्यानगरमधील पोलिस निरिक्षकासाठी लाच स्विकारणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी
- डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीचा बिगूल वाजला, ३१ मे रोजी मतदान तर १ जूनला लागणार निकाल
- थोरात साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध, सहकारात आपलाच दबदबा असल्याचे थोरातांनी राजकीय डावपेचातून विरोधकांना दिले दाखवून